Bandhkam Kamgar Scholarship Yojana : महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह बांधकाम कामगारांच्या रोजच्या कष्टावर चालतो. दिवसभर मेहनत करूनही अनेकदा घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च सांभाळणे कठीण जाते. अशा परिस्थितीत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण सोडावं लागू नये आणि त्यांच्या पालकांवरील आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ती म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना.
ही योजना Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board (MAHABOCW) मार्फत राबवली जाते. या योजनेत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना इयत्तेनुसार दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.
या योजनेचा उद्देश काय आहे?
या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. अनेक कुटुंबांमध्ये पालक रोजंदारीवर काम करत असल्यामुळे शिक्षणासाठी आवश्यक फी, पुस्तकं, प्रवासखर्च आणि इतर गरजा भागवणे कठीण जाते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य ठेवणे सोपे होते आणि पालकांवरील खर्चाचा भारही कमी होतो.
शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
अर्जदार हा महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करणारा कामगार असावा आणि त्याची MAHABOCW मध्ये नोंदणी वैध असावी. तसेच त्यांचा मुलगा किंवा मुलगी शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेत असावा.
काही प्रकरणांमध्ये कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर तिलाही शिष्यवृत्ती मिळण्याची तरतूद आहे, अशी माहिती योजनेत दिली आहे.
शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतात. मुख्य कागदपत्रांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
विद्यार्थ्याची 75 टक्के उपस्थितीचे प्रमाणपत्र
शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
आधार कार्ड
स्वयंघोषणापत्र
रेशन कार्ड
कागदपत्रे आधीच स्कॅन करून ठेवली तर अर्ज करताना वेळ वाचतो.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी mahabocw.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईट उघडल्यानंतर “Apply Online for Claim” हा पर्याय निवडा. पुढे “New Claim” वर क्लिक करा.
यानंतर तुमचा 14 अंकी नोंदणी क्रमांक टाका आणि मागितलेली सर्व माहिती अचूक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पोचपावती क्रमांक मिळेल. हा क्रमांक पुढे अर्जाची स्थिती तपासण्यासाठी उपयोगी पडतो, त्यामुळे तो जतन करून ठेवणे महत्त्वाचे आहे.
कोणत्या इयत्तेसाठी किती शिष्यवृत्ती मिळते?
या योजनेत विद्यार्थ्याच्या इयत्तेनुसार शिष्यवृत्तीची रक्कम वेगळी आहे.
इयत्ता 1वी ते 7वी पर्यंत दरवर्षी 2,500 रुपये
इयत्ता 8वी ते 10वीसाठी दरवर्षी 5,000 रुपये
तसेच 10वी किंवा 12वीमध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवल्यास 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळू शकते.
याशिवाय काही उच्च शिक्षणासाठीही अनुदान दिले जाते. वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपये आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी 60,000 रुपयांपर्यंत मदत मिळू शकते.
नोंदणी का गरजेची आहे?
बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी MAHABOCW नोंदणी असणे ही सर्वात महत्त्वाची अट आहे. अनेक कामगारांना योजनेची माहिती नसते किंवा नोंदणी प्रक्रिया माहित नसते, त्यामुळे लाभ मिळत नाही.
जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल तर मंडळावर नोंदणी करणे ही पहिली पायरी आहे. नोंदणी झाल्यावर शिष्यवृत्तीबरोबरच इतर अनेक योजनांचाही लाभ घेता येतो.
हे वाचा – लाडकी बहीण योजना: KYC असूनही पैसे आले नाहीत? यामागचे 3 मोठे कारण